वेल्हे येथील पीडीडीसी बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल; रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केला होता

वेल्हे, 11 मे: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. या मतदानाच्या आदल्या दिवशी वेल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा रात्री 12 वाजल्या तरीही सुरू होती. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी वेल्हे शाखेतील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या व्यवस्थापकाच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने या बँकेतील त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या रात्री बँकेत 40 ते 50 कर्मचारी असल्याचे आढळून आले. त्याच्याआधारे निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1787552093307617403?s=19

रोहित पवारांनी ट्विट केले होते 

तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वेल्हे येथील ही पीडीडीसी बँक 6 मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर लोकसभा निवडणुकीत पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली होती. “पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा. निवडणूक आयोग दिसतंय ना? सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल,” असे ट्विट पवार यांनी केले होते.

अजित पवारांनी आरोप फेटाळले होते

दरम्यान, रोहित पवार यांचे हे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले होते. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. ती पीडीडीसी बँक 12 वाजल्यानंतर उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ त्या वेळेचाच होता का? असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले होते. तसेच हे सगळं पाहण्याचे काम निवडणूक आयोगाचे अधिकारी, स्कोड, पोलीस यंत्रणा यांचे असते. असेही अजित पवार यावेळी म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *