एकनाथ शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त गाणे, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, 24 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कामरा याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://x.com/ANI/status/1903971096099176574?t=MFuuQQCguBEIjZmjm6wn2w&s=19

काय आहे व्हिडिओ?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याच्या शोदरम्यानचा आहे. या व्हिडिओत त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच त्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी एक गाणे म्हटले. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्याने शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले होते.

https://x.com/ANI/status/1904018714829406535?t=Xw7yy591uc52J5yyQZnEpQ&s=19

शिवसैनिकांकडून स्टुडिओची तोडफोड

हा व्हिडिओ समोर येताच शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी रविवारी (दि.23) खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली. दरम्यान, हॅबिटॅट स्टँडअप कॉमेडी सेटची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे सरचिटणीस राहूल कनाल आणि अन्य 19 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी बीएनएस आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिवसैनिकांचा इशारा

दरम्यान, यासंदर्भात आमदार मुरजी पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुणाल कामरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आमच्या नेत्यावर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी त्यांना दोन दिवसांत एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास सांगतो, नाहीतर शिवसैनिक त्यांना मुंबईत फिरू देणार नाहीत. आम्ही हा मुद्दा विधानसभेत मांडू आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती करू.” असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *