जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर, 06 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 353(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

https://x.com/ANI/status/1831908386524557756?s=19

https://x.com/Awhadspeaks/status/1831553282738663611?s=19

चुकीची माहिती पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर राज्य सरकारचा एक जीआर शेअर केला होता. तसेच त्यांनी यावेळी ह्या जीआरचा चुकीचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद झाला असल्याचे म्हटले होते. “आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक ‘लाडकी बहीण’ चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना? शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे ‘लाडकी बहीण’ योजनेला,” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केली होती. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://x.com/CMOMaharashtra/status/1831677500566516185?s=19

सरकारने दिले स्पष्टीकरण

या जीआर संदर्भात राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत, शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. या बाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *