बस आणि टँकरची धडक, 18 प्रवाशांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

उन्नाव, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे आज डबलडेकर बस आणि टँकरची धडक झाली. या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 19 जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 जखमींवर उपचारासाठी लखनौ येथे उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमींची ओळख पटवली जात आहे. उन्नाव जिल्ह्यातील या अपघाताची दखल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://x.com/AHindinews/status/1810877776226107588?s=19



दरम्यान, उत्तर प्रदेशातील बेहता मुजावर पोलिस स्टेशन हद्दीतील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर आज पहाटे सव्वा पाच वाजता बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या डबल डेकर बसची आणि दुधाच्या टँकरची धडक झाली. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमाऊ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवले. दिल्लीला जाणाऱ्या या खासगी बसमध्ये अपघातावेळी सुमारे 57 प्रवासी होते.

या अपघातासंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उच्चस्तरीय रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यासाठी उन्नाव आणि कानपूरच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश जखमी बिहारमधील आहेत, आम्ही बिहार सरकारच्या संपर्कात आहोत. तपासानंतर घटनेचे कारण कळेल. मात्र सध्या जखमींवर उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी केली मदत जाहीर

दरम्यान, उन्नाव येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. या कठीण काळात ईश्वर त्यांना शक्ती देवो. यासोबतच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *