बुलढाणा, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये केस गळती होऊन टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 8 जानेवारी 2025 पासून शेगांव तालुक्यातील पहुरजिरा, कालवड, बोडगांव, माटरगांव बु, कठोरा, तरोडा कसबा, घुई, हिंगणा वैज, भोनगांव, मच्छिद्रखेड आणि निंबी या 11 गावांमध्ये केस गळतीची समस्या समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 139 नागरिकांना टक्कल पडण्याची समस्या आढळली आहे.
https://x.com/InfoBuldhana/status/1878121570729955729?t=jIJnGSgNHe1V9QQAbuexsA&s=19
या गावांत रुग्ण आढळले
यामध्ये पहुरजिरा गावात 23 रुग्ण, कालवड गावात 22 रुग्ण, बोडगांव येथे 20 रुग्ण, माटरगांव बु येथे 19 रुग्ण, कठोरा गावात 13 रुग्ण, तरोडा कसबा येथे 10 रुग्ण, घुई गावात 8 रुग्ण, हिंगणा वैज गावात 7 रुग्ण, भोनगांव येथे 7 रुग्ण, मच्छिद्रखेड येथे 5 रुग्ण, 11 निंबी येथे 5 रुग्ण आढळले आहेत. याची माहिती बुलढाणा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त
वरील सर्व बाधित गावांतील बोअरवेल, विहीर, नदी आणि तलावाचे पाणी तपासणीसाठी बुलढाणा भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच, पाण्याच्या नमुन्यात आर्सेनिक, लीड, मर्क्युरी आणि कॅडमियम यांसारख्या हानिकारक पदार्थांचे प्रमाण तपासण्यासाठी नाशिक येथील खाजगी (एनएबीएल) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार, पाण्याच्या नमुन्यात आर्सेनिक, लीड, मर्क्युरी आणि कॅडमियम आढळले नाहीत. पण 14 नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त आढळले. त्यामुळे, संबंधित गावांतील पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले.
केंद्रीय मंत्री आणि तज्ञांची भेट
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बाधित गावांना भेट दिली आहे. तसेच केंद्र सरकारच्या आयसीएमआर संस्थेचे तज्ञ डॉक्टरांचे पथक पुढील तपासणीसाठी लवकरच गावांमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सर्व परिस्थिती राज्य सरकारसमोर ठेवली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून यावर लक्ष दिलं जात आहे.
तपासणी आणि अहवाल
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील त्वचारोग तज्ञांनी रुग्णांची तपासणी करून फंगल इन्फेक्शनची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, आरोग्य केंद्रावर उपचार सुरू केले आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा बायोप्सी तपासणीसाठी हे नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार, रुग्णांच्या केस, नखे आणि डोक्याच्या कातडीवर फंगल इन्फेक्शन आढळले नाही.
तज्ञांच्या पथकाकडून सर्वेक्षण
10 जानेवारी रोजी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ आणि त्वचारोग तज्ञांच्या पथकाने सर्वेक्षण केले. याचा सविस्तर अहवाल अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करण्यास सांगितले आहे. तसेच 10 जानेवारी रोजी सदर पथकाने 11 गावांतील 65 पेक्षा जास्त नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतले. स्थानिक पातळीवर तपासणी केली असता, केस गळतीशी संबंधित काहीही समस्या आढळली नाही. अन्न सुरक्षा अधिकारी यांनीही बाधित गावांना भेट देऊन किराणा दुकानदारांकडून साबण, केश तेल आणि शांपूचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जनजागृती करून नागरिकांना सावध राहण्याचे आणि पिण्याचे तसेच आंघोळीचे पाणी वापरण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात आयसीएमआरच्या पथकाच्या तपासणी आणि सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.