संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून; सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान होणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. ही बैठक 30 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील संसद ग्रंथालय भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

https://twitter.com/PIBMumbai/status/1751940203571499469?s=19

1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार

दरम्यान, 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होईल. त्यानंतर आवश्यक ते सरकारी कामकाज पार पाडल्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी अधिवेशन हे संपेल. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. याची माहिती संसदीय कामकाज मंत्रालयाने दिली आहे.

मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

दरम्यान, संसदेचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनानंतर काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये, केंद्र सरकार देशातील शेतकरी, महिला, तरूणवर्ग, गरीब जनता यांच्यासाठी ह्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या योजना आणू शकते. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात देखील या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे देशातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *