दौंड, 3 सप्टेंबरः दोन दिवसांपासून दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील कुरकुंभ, जिरेगाव, मळद, रावणगाव, खडकी परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. या पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. ओढ्यावरील मळद, रावणगाव, नंदादेवी, खडकी येथील ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांच्या दळणवळणाची गैरसोय होत आहे.
खडकी गावातील काळेवस्ती नंबर 2 कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर दहा फुटापेक्षा जास्त पाणी झाल्याने दळणवळण बंद आहे. त्यामुळे वळसा घालून शाळेसह दैनंदिन कामासाठी गावात यावे लागत आहे. तर, काही पुलांवरील पाणी पातळी कमी असल्याने महिला, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वाहनचालकांना दळणवळण करणे अजून शक्य होत आहे.
जोरदार पावसामुळे जिरायती क्षेत्रातील पिकांना फायदा होणार आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेल्या कांद्याच्या वखारींमध्ये पावसाचे पाणी जाऊन कांदा भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.