भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून बॉक्सिंग डे कसोटी सामना

सेंच्युरियन, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियन येथील ऐतिहासिक सुपरस्पोर्ट पार्कवर खेळविण्यात येणार आहे. हा सामना दुपारी 1:30 वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय संघ ही कसोटी मालिका खेळण्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. दरम्यान, 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट असे म्हटले जाते. कारण, ख्रिसमसच्या नंतरच्या दिवसाला (26 डिसेंबर) बॉक्सिंग डे असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी सुरू होणाऱ्या प्रत्येक कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट असे म्हटले जाते.

वरिष्ठ खेळाडू संघात परतणार!

तत्पूर्वी, भारतीय संघाने या मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली आहे. यामध्ये टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. तर एकदिवसीय मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघाचा प्रयत्न आता कसोटी मालिका जिंकण्यावर असणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. तर आता रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेत संघात परतणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1739504303512183214?s=19

भारत-दक्षिण आफ्रिका रेकॉर्ड 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 42 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 15 सामने जिंकले असून आफ्रिकेने 17 सामने जिंकले आहेत. 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. दरम्यान, भारतीय संघाने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकपण कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत 31 वर्षानंतर कसोटी मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सामन्यात पाऊस अडथळा ठरणार?

तत्पूर्वी, आजपासून सुरू होणाऱ्या या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सुपरस्पोर्ट पार्कमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाज हे फलंदाजांसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स चॅनलवर थेट पाहता येणार आहे. तसेच डीडी फ्री डिश वरील डीडी स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना मोफत पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्हाला हॉटस्टार या ॲपवरून देखील हा सामना ऑनलाईन मोफत पाहता येणार आहे.

कसोटी मालिकेतील भारतीय संघ:-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू इसवरन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसिध कृष्णा.

कसोटी मालिकेतील दक्षिण आफ्रिका संघ:-

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जिओर्गी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को जॅन्सन, वियान मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), काईल वेरेन, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *