पर्थ, 22 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेला आजपासून (दि.22) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर खेळविण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू, प्रथम फलंदाजी करण्याचा हा निर्णय भारतीय संघावरच उलटला आहे. या सामन्यात लंच अखेर भारताच्या 4 बाद 51 धावा झाल्या आहेत. त्यामुळे या सामन्याचा पहिला सेशन ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला आहे.
https://x.com/BCCI/status/1859779483513069650?t=7n8Wd7C8S9qlDEcBtt_nlw&s=19
https://x.com/ICC/status/1859818689777779158?t=W3fvZkoTgWLwxxEJSr46-w&s=19
लंच अखेर भारत 4 बाद 51 धावा
भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरूवात केली. या सामन्याच्या सुरूवातीलाच भारताला पहिला धक्का बसला. डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला झेलबाद केले. तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो देखील विशेष काही करू शकला नाही. देवदत्त पडिक्कल हा जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर खाते न उघडताच बाद झाला. त्याने 23 चेंडूंचा सामना केला. तो बाद झाल्यावर विराट कोहली क्रीजवर आला. मात्र, विराट कोहलीचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला असल्याचे दिसून आले. यावेळी विराट कोहली जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 12 चेंडूत 5 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने कडवी झुंज देणारा केएल राहुल देखील बाद झाला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. परंतु तो मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. केएल राहुलने या सामन्यात 71 चेंडूत 26 धावा केल्या. तर सध्या ध्रुव जुरेल (4 धावा) आणि रिषभ पंत (10 धावा) हे खेळपट्टीवर आहेत.
नितीश रेड्डी, हर्षित राणा यांचे पदार्पण
तत्पूर्वी, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळणार नाही आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी भारतीय संघात पदार्पण केले. तसेच फलंदाज शुभमन गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळणार नाही. अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या जागी देवदत्त पडिक्कल याची संघात निवड करण्यात आली. याशिवाय, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकी गोलंदाजांना डावलून वॉशिंग्टन सुंदर या युवा फिरकी गोलंदाजांची भारतीय संघात निवड केली गेली आहे. भारतीय संघाच्या या निर्णयावर सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर ध्रुव जुरेलला देखील खेळण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असणार आहे.
भारतीय संघ:- केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ:- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.