इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी, विमानाची नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर, 01 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर हे विमान नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. नागपूर विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आणि या विमानाची तपासणी करण्यात आली. इंडिगो कंपनीने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. दरम्यान, तपासणी केल्यानंतर या विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे उघडकीस आले.

https://x.com/ANI/status/1830141368410243483?s=19

विमान जबलपूरहून हैदराबादला जात होते

मध्य प्रदेशातील जबलपूरहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 7308 या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. रविवारी (दि.01) सकाळी ही घटना घडली. या प्रकारामुळे संबंधित विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना पाणी आणि अल्पोपाहार देण्यात आला. या घटनेनंतर विमानाची सुरक्षा यंत्रणेकडून आवश्यक कसून तपासणी करण्यात आली असून या विमानात संशयास्पद असे काही आढळले नाही.

खोट्या धमक्या देण्याच्या घटनेत वाढ

दरम्यान, अशा प्रकारच्या खोट्या धमक्या मिळणाऱ्या घटना काही नव्या नाहीत. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. याच्या आधी 22 ऑगस्ट रोजी मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. तेंव्हा तिरुअनंतपुरम विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर या विमानाची तपासणी करण्यात आली. परंतु त्यावेळी सुरक्षा यंत्रणांना या विमानात काहीच सापडले नव्हते. त्यामुळे ही फसवणूक असल्याचे दिसून आले. अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देण्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *