मुंबई, 06 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेस मध्ये लपवून ट्रेनमधून घेऊन जाणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सामानाची तपासणी करीत असताना त्यांच्या सुटकेस मध्ये एकाचा मृतदेह असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा मृतदेह सुटकेस मध्ये घेऊन जात होते. अशी माहिती पायधुनी पोलिसांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1820658870307770418?s=19
झडती घेतल्यानंतर गुन्हा उघडकीस
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर हा प्रकार उघडकीस आला. संशय आल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) अधिकाऱ्यांनी या दोघांकडे असलेली सुटकेस उघडली. त्यानंतर त्यांना सुटकेस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. हा मृतदेह अर्शद खान या व्यक्तीचा आहे. त्याचा खून पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे उघड झाले. दरम्यान, अर्शद खान आणि अटक केलेले दोघे यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत अर्शद खानचा मृत्यू झाला.
अटक केलेले जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग या दोघांवर अर्शद खानच्या हत्येचा संशय आहे. दादर रेल्वे स्थानकावर मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटक केली. त्यावेळी एक आरोपी पळून गेला होता, त्यालाही पोलिसांनी काही वेळाने उल्हासनगर येथून अटक केली. सध्या या घटनेचा तपास पायधुनी पोलीस करीत आहेत.