उजनी पाणलोट क्षेत्रात बोट उलटली; सहा जण बेपत्ता, सुप्रिया सुळेंची घटनास्थळी पाहणी

इंदापूर, 22 मे: (विश्वजीत खाटमोडे) इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कळाशी येथे वाहतूक करणारी एक बोट पाण्यात उलटली असल्याची घटना घडली आहे. ही घटना काल (दि.21) सायंकाळी घडली. या बोटीतून एकूण 7 जण प्रवास करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक जण सुखरूप आहे. तर या दुर्घटनेत 6 जण बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेतला जात आहे. एनडीआरएफ चे पथक सध्या घटनास्थळी असून तेथे बचावकार्य सुरू आहे. काल रात्रीपासून याठिकाणी बचावकार्य सुरू होते, ते आजही सुरूच आहे. तर अद्याप बेपत्ता लोकांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, हे सर्वजण सुखरूप बाहेर यावेत, यासाठी सध्या प्रार्थना केली जात आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1793140053063155825?s=19

एक जण सुखरूप

या दुर्घटनेतील 6 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे. तर दुर्घटनेतील एका व्यक्तीने भीमा नदी पात्रात पोहत येऊन आपला जीव वाचवला आहे. राहुल डोंगरे असे या दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल डोंगरे हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. ते सुखरूप पाण्याच्या बाहेर आले आहेत.

https://twitter.com/supriya_sule/status/1792946420997312994?s=19

सुप्रिया सुळेंनी घेतला आढावा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज कळाशी येथे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील मदत आणि बचावकार्याचा सविस्तर आढावा घेतला. तत्पूर्वी या दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी काल एक ट्विट केले होते. कळाशी येथील दुर्घटनेत काहीजण बेपत्ता असून, येथे मदत आणि बचावकार्य करण्यासाठी आणखी साधनसामग्रीची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची दखल घेऊन तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमधून केली होती. सदर घटना अतिशय गंभीर असून येथील मदत आणि बचाव कार्याचा मी सातत्याने आढावा घेत असून याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. बेपत्ता असणारे सर्वजण सुखरुप असावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *