दौंड, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यास आता सुरूवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल जाहीर झाला आहे. दौंड मतदारसंघात भाजप उमेदवार राहुल कुल यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. दरम्यान, राहुल कुल यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. या विजयासह राहुल कुल यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
कोणाला किती मतदान?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्याशी झाला. या लढतीत राहुल कुल यांनी 13 हजार 889 मतांनी विजय मिळवला आहे. यायामध्ये राहुल कुल यांना 1 लाख 20 हजार 721 इतकी मते मिळाली. तर रमेश थोरात यांना 1 लाख 06 हजार 832 इतके मतदान झाले.
गेल्यावेळी अटीतटीची लढत झाली होती
तत्पूर्वी, राहुल कुल हे दौंडचे विद्यमान आमदार आहेत. राहुल कुल यांनी याआधी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. राहुल कुल यांनी 2014 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. तर 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. तेंव्हाच्या निवडणुकीत राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा केवळ 746 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने राहुल कुल यांना दौंडमधून पुन्हा एकदा उमेदवारी दिली. या निवडणुकीत राहुल कुल हे आता 13 हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत.