पुण्यातील तिरंगी लढतीत भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी!

पुणे, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी 1 लाख 23 हजार 038 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आणि गुलाल उधळून फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. दरम्यान, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली.

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1798050359971311872?s=19

कोणाला किती मतदान?

या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात विजयी उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एकूण 5 लाख 84 हजार 728 इतक्या प्रचंड प्रमाणात मते मिळाली. यामध्ये त्यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 52.94 टक्के इतकी होती. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांना एकूण 4 लाख 61 हजार 690 मते मिळाली. धंगेकर यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 41.8 टक्के इतकी होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे या मतदानात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यामध्ये वसंत मोरे यांना 32 हजार 012 इतकी मते पडली आहेत. तर या लोकसभा निवडणुकीत 7 हजार 460 पुणेकरांनी नोटाचा पर्याय निवडला. या संदर्भातील माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी मानले आभार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून जनतेचे आभार मानले आहेत. “खरं तर शब्द सुचत नाहीयेत. माय-बाप जनतेच्या अफाट प्रेमामुळं मिळालेला, लोकशाहीच्या मंदिरात घेऊन जाणारा हा विजय माझ्यासाठी जिवाचं रान केलेल्या सर्वांचा आहे. मात्र, हा विजय मी अत्यंत विनम्रतापूर्वक माजी खासदार, माझे मार्गदर्शक आणि व्यासंगी राजकीय नेते स्वर्गीय गिरीश बापट यांना समर्पित करतो,” असे ते यामध्ये म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी लोकसभेची निवडणूक प्रथमच लढवणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच एनडीएसोबत असलेल्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी मोलाची मदत केली. कार्यकर्त्यांनी जिवाचं रान केलं अन् मतदारांनी विश्वास टाकला. या सर्वांच्या प्रचंड कष्टांमुळं साकारलेला हा विजय सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. या विजयाचं, मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोन करण्याची मोठी जबाबदारी आता माझ्यावर आहे, याची मला कल्पना आहे. पुणेकर मतदारांचे आभार व्यक्त करायला माझे शब्दही अपुरे पडतील,” असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *