भाजप पक्ष लोकनेत्यांना संपवतो, रोहित पवार यांची भाजपवर टीका

मुंबई, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप तसेच महायुतीचा एकही नेता उपस्थित नव्हता. याशिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधील एका लेखात भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला असल्याची टीका केली होती. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1801552026624737749?s=19.

रोहित पवारांचे ट्विट

या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाची युज अँड थ्रो प्रवृत्ती असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. “अजित पवार यांच्यामुळे भाजपाने स्वतःची ब्रॅण्ड व्हॅल्यू संपवल्याची आधी ऑर्गनायझरमधून झालेली टीका. नंतर दहा वर्षे शांत झोपलेल्या कथित गांधींनी अचानक जागे होऊन शिखर बँक प्रकरणी अजित पवार यांच्या क्लिन चिट विरोधात न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका आणि काल राज्यसभेचा अर्ज भरताना एकाही भाजपेयीची नसलेली उपस्थिती हा घटनाक्रम लक्षात घ्या,’ असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1801583097412038685?s=19

अजित पवारांकडून चर्चांना पूर्णविराम

दरम्यान, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. “तुम्हाला काही माहीत नसते. बातम्या पेरण्याचे काम तुम्ही करता. तो तुमचा अधिकार आहे. तरीही काही विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील. त्यांनी अशाप्रकारच्या बातम्या पिकवल्या आहेत. त्या बातम्या तूसभरही तथ्य नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच काल आम्ही राज्यसभेसाठी फॉर्म भरला. त्यावेळी एक दुःखद घटना घडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले अमोल काळे यांचे निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी फडणवीस यांना नाशिकला जायचे होते. त्यामुळे दोन-तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहेत,” असे अजित पवारांनी सांगितले. “तसेच एकनाथ शिंदे यांना देखील मी आदल्या दिवशी वर्षा बंगल्यावर जाऊन भेटलो होतो. त्यावेळी त्यांना मी सांगितले होते की, आज किंवा उद्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव ठरणार आहे. सगळ्यांनी फॉर्म भरायला यावे, असे मला वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी फॉर्म भरून या, महायुती बरोबर असल्याचे म्हटले होते. तरी देखील फॉर्म भरताना महायुतीचे कोणीही नव्हते, अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांनी लावल्या. मी महायुतीच्या नेत्यांना बोलावले नव्हते,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *