मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी; उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांचे ट्विट!

मुंबई, 28 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी भाजपने पूनम महाजन यांचे लोकसभेचे तिकीट कापले आहे. पूनम महाजन या 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आता त्यांच्या जागी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. दरम्यान, भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आल्याने सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांनी ट्विट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

https://twitter.com/poonam_mahajan/status/1784234086703267846?s=19

पूनम महाजन काय म्हणाल्या?

“मला 10 वर्षे खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. केवळ खासदार म्हणूनच नव्हे, तर एक मुलगी म्हणूनही माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी कुटुंबाप्रमाणे परिसरातील जनतेची सदैव ऋणी राहीन आणि हे नाते सदैव टिकून राहो, अशी आशा आहे.” यापुढे त्यांनी लिहिले की, “माझे आराध्य दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला ‘आधी राष्ट्र, मग आम्ही’ हा मार्ग दाखवला, मी देवाला प्रार्थना करते की, मी आयुष्यभर त्याच मार्गावर जाऊ शकेन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र!” अशा पूनम महाजन या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

पूनम महाजन यांची राजकीय कारकीर्द 

दरम्यान, पूनम महाजन या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. पूनम महाजन यांनी पहिल्यांदा घाटकोपर पश्चिम मतदार संघातून 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पूनम महाजन यांना भाजपकडून मुंबई उत्तर मध्यमधून 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आता भाजप उमेदवार उज्ज्वल निकम आणि काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *