बारामतीत अजित पवारांसाठी भाजपकडून बॅनरबाजी; कार्यकर्ते मात्र संभ्रमात

बारामती, 5 जुलैः (प्रतिनिधी- अभिजीत कांबळे) सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालट होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्याचे राज्याने पाहिले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा गट तर अजित पवार यांच्या नेतृत्वात दुसरा गट तयार झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही शिवसेना होणार की काय? अशा प्रश्न सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कोणाचा झेंडा घ्यायचा हाती? हा प्रश्नच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथा राज्यासह देशपातळीवर विकास मॉडेल म्हणून राष्ट्रवादीकडून दरवेळी सादर करण्यात येत असलेल्या बारामती शहरात पुर्वी पारंपारिक विरोधी असणाऱ्या आणि आता त्याच पक्षासोबत सत्तेत भागिदारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मोठ मोठे बॅनर बारामती नगरीत झळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आले आहेत, मात्र एकाला चाणक्य ही उपादी देण्यात आली आहे, तर दुसऱ्याला उपमुख्यमंत्री झालात म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

बारामती दूध संघाच्या चेअरमन पदी पोपटराव गावडे यांची निवड

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयास आल्यापासून आता पर्यंत बारामती नगर परिषद, बारामती पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, पतसंस्था, कारखाने, पीडीसी बँक निवडणुका, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, गृहनिर्माण संस्था निवडणुका, दुध संघ, खरेदी विक्री संघ, शिक्षक संस्था तसेच बारामती विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बॅनरबाजीवरून बारामतीकरांच्यात द्विधा मनःस्थिती निर्माण झाली आहे. अजित पवारांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत फटाकेही वाजवले गेले. मात्र पुर्वी प्रमाणे सत्ता मिळाल्यानंतर जो उत्साह बारामतीकरांच्यात असतो, तो मात्र यावेळी दिसला नाही.

असं म्हटलं जातं की, राजकारणात कुणीही कोणाताच शत्रु नाही किंवा मित्र नाही. मात्र हेही म्हटले जाते की राजकीय पक्षाचे आपले ध्येय धोरणे असतात, त्यांची विचारधारा असते, असेच काहीतरी आता राष्ट्रवादी पक्षात होताना दिसत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवार भाजपसोबत

येत्या काही दिवसात राष्ट्रवादी पक्षात पडलेली फुट भरते, की ती अजून वाढत जाणार हे स्पष्ट होणार आहे. सध्यातरी बारामतीत भाजपकडून अजित पवारांना देण्यात आलेल्या शुभेच्छांवर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संभ्रमात दिसत आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर ठराविक ठिकाणीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी होताना दिसत आहे. हीच अवस्थाही भाजप कार्यकर्त्यांमध्येही दिसत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोठा त्याग, विरोध, आणि शुन्यातून एक एक कार्यकर्ता हाताशी धरून ताकद निर्माण होत असताना अजित पवारच शिंदे- फडणवीस सरकारमध्ये आल्यानंतर आपल्या मेहनतीवर पाणी फिरल्याची भावनाही काही भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. कारण आगामी काळात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता कोणा विरोधात निवडणुका लढवायच्या? येत्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढली तर किती जागा भाजपच्या वाट्याला येणार? हा प्रश्न भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे कुणाचा झेंडा घेऊ हाती?, हाच प्रश्न सध्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

One Comment on “बारामतीत अजित पवारांसाठी भाजपकडून बॅनरबाजी; कार्यकर्ते मात्र संभ्रमात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *