कार अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; आमदाराच्या पुतण्याला न्यायालयीन कोठडी

मंचर, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावरील मंचर शहरातील कळंब गावाजवळ रविवारी रात्री एसयूव्ही कारने दिलेल्या धडकेत एका 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताप्रकरणी एका 34 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. मयूर साहेबराव मोहिते असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, मयूर मोहिते हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या आहे.

https://x.com/ANI/status/1804797984657617034?s=19

https://x.com/ANI/status/1804818696747311587?s=19

पोलीस अधिकाऱ्यांची माहिती

या अपघातासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अधिक माहिती दिली. काल रात्री 9.31 च्या सुमारास मंचर परिसरात हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 19 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झाला. तो दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली. आरोपीची ओळख पटली. त्याला अटक करण्यात आली आहे. आता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. असे पंकज देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, अपघातप्रकरणी मयूर मोहिते याच्या विरोधात भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन कोठडी

या अपघात प्रकरणी मयूर मोहिते याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा रंगली आहे. तर गेल्या महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एक हायप्रोफाईल अपघात प्रकरण घडले होते. या अपघातात दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार चालवत दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाद वाढल्यानंतर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर या आरोपीचे आई, वडील, आजोबा यांच्यासह अनेकजण सध्या तुरूंगात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *