दिल्ली, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या कामगिरीबद्दल विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला बीसीसीआयने मोठे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयने भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
https://x.com/JayShah/status/1807415146760818693?s=19
जय शाह यांचे ट्विट
“आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 च्या विजेत्या भारतीय संघासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि कौशल्य प्रदर्शित केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन,” असे जय शाह यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आयसीसीने दिले 20.36 कोटींचे बक्षीस
दरम्यान, 2024 च्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. या मोहिमेत भारतीय संघ अपराजित राहिला. त्यामुळे एकही सामना न गमावता विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला आयसीसी कडून बक्षीस म्हणून 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.
अंतिम सामन्यात 7 धावांनी विजय
तत्पूर्वी, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 169 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या या कामगिरीमुळे त्यांचे सध्या कौतुक केले जात आहे.