मुंबई, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. अखेर त्यांची ही मागणी केंद्राने मान्य केली आहे. त्यामुळे उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी आपला पीकविमा 31 जुलैपर्यंत भरून घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1812825631819763859?s=19
https://x.com/RRPSpeaks/status/1812833083042963817?s=19
धनंजय मुंडे, रोहित पवारांनी मानले आभार
“केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे मनस्वी आभार!” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करून केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. “पीक विमा योजनेचे अर्ज करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल केंद्र सरकारचे व त्यासाठी विनंती केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार! या मुदतवाढीचा शेतकरी बांधवांनी लाभ घेऊन आपल्या खरीप पिकाच्या विम्याचे फॉर्म भरून द्यावेत, ही विनंती!” असे आवाहन त्यांनी या ट्विटमधून केले आहे.
एक रुपयात पीकविमा योजना
दरम्यान, राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी 18 जूनपासून पिक विमा भरण्यास सुरूवात झाली आहे. त्याची मुदत आज समाप्त होणार होती. परंतु, आता या योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या योजनेत राज्यातील शेतकरी बांधवांना भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या 14 पिकांसाठी पीक विमा भरता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून सीएससी केंद्रांमधून केवळ एक रुपयाचा विमा भरून आपला पीक विमा काढता येणार आहे.