मुंबई, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे आणि त्यांच्या हत्येचे फोटो सोमवारी (दि.03) समोर आले होते. त्यानंतर आज (दि.04) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाल्याचे धनंजय मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर सध्या अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.
https://x.com/dhananjay_munde/status/1896801145974296846?t=s5atqsAjmGO9ynNref6AZg&s=19
धनंजय मुंडे यांनी काय म्हटले?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजीनाम्याची मागणी केली जात होती
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्रीपद होते. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. तत्पूर्वी, संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि समाज माध्यमातून केला जात होता. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. परंतु, धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा न देण्यावर ठाम होते. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
https://x.com/ANI/status/1896792913662902333?t=ElPwSjzerJr_9PA98Ryahw&s=19
धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाही साठी राज्यपालांकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे.