पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई! जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्याचे निर्देश

मुंबई, 16 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत मोठी बातमी आहे. राज्य सरकारने आज पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पूजा खेडकर यांनी जिल्हा प्रशिक्षण थांबवून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अकादमीत परत हजर व्हावे, असे देखील निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत भारत सरकारच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने महाराष्ट्र सरकारला सूचना केली होती. दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुणे येथे जिल्हा प्रशिक्षणादरम्यान केलेल्या वर्तनाबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

https://x.com/ANI/status/1813177167414718866?s=19

23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे आदेश

पूजा खेडकर यांना आता कोणत्याही परिस्थितीत 23 जुलै 2024 पूर्वी मसूरी येथील अकॅडमी मध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची काही दिवसांपूर्वीच पुण्यातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पुणे येथे प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडे अनेक अतिरिक्त मागण्या केल्या होत्या. यामध्ये त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन देखील मागितली होती. त्यावरून पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकर यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली होती.

खाजगी गाडीवर लाल दिवा लावला होता

याशिवाय, खाजगी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी देखील पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. यासंदर्भात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यासोबतच पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे सादर केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांकडे कोट्यवधींची संपत्ती असून देखील त्यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे काय सादर केले? असा प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जातोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती 2 आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे या अहवालातून कोणती माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *