पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फलटण-बारामती नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजन!

बारामती, 12 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह देशातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील फलटण-बारामती या 38 किमीच्या नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई सेंट्रल स्थानक येथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आदी मान्यवर सहभागी झाले होते.

506 रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85 हजार कोटींहून अधिक रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 90 वंदेभारत एक्सप्रेस गाड्यांसह इतर रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. रेल्वेच्या या प्रकल्पांमध्ये राज्यातील एकूण 506 प्रकल्पांचा समावेश आहे. यावेळी फलटण-बारामती 38 किमी नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजन, 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, 130 सौर पॅनेल, 18 नवीन रेल्वेमार्ग, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, गेज रुपांतरण, 12 गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, 4 गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, पाच जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन, 4 रेल कोच रेस्टॉरंट यांसारख्या आदी रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

आधुनिक रेल्वे देशभरात पोहोचवणार: मोदी

देशातील सर्वसामान्यांचा नवनवीन योजनांच्या माध्यमातून सातत्याने विकास होत असून, आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिकचे प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून, रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. तसेच जीवनवाहिनी ठरलेल्या रेल्वेच्या देशभर पसरत चाललेल्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक बदल होत आहे. देशात दररोज 15 किमीचे नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहेत. रेल्वे गाडी प्रमाणेच देशाच्या विकासाची गाडी वेगाने धावत आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *