पंतप्रधानांच्या हस्ते आज पुण्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण!

पुणे, 29 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.29) महाराष्ट्रातील 11 हजार 200 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज या मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. हा मेट्रो मार्ग सुमारे 5.46 किमी लांबीचा असून तो मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांसह पूर्णपणे भूमिगत आहे.

https://x.com/narendramodi/status/1840071577603584060?s=19

सोलापूर विमानतळाचे उद्घाटन

यासोबतच पुण्यातील भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाचे भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान यांच्या हस्ते यावेळी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विमानतळामुळे सोलापुरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल आणि सोलापूर येथील पर्यटक, व्यावसायिक प्रवासी आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि.29) पुणे दौऱ्यावर येणार होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार होते. तसेच या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांची पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा पार पडणार होती. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु, पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा दौरा ऐनवेळी रद्द करावा लागला होता. त्यानंतर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पाडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *