बारामती, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ परभणीत पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. याप्रकरणात पोलिसांनी 50 भीमसैनिकांना अटक केली. यादरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका भीमसैनिकांचा कारागृहातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांच्या वतीने बारामती शहरात सोमवारी (दि.16) दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामतीत उद्या निषेध मूक मोर्चा
तसेच या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात सोमवारी (दि.16) निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मूक मोर्चा उद्या सकाळी 10 वाजता शहरातील सिद्धार्थनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंदापूर चौक – गुनवडी चौक – गांधी चौक – भिगवण चौक नगरपालिकेच्या समोर या मार्गी काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी बारामती शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले. या निषेध मूक मोर्चानंतर भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला उपस्थितांकडून पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचे निधन
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी परभणी शहरात पुकरण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. याप्रकरणात पोलिसांनी अनेक भीमसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या भीमसैनिकांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांचे न्यायालयीन कोठडीतच निधन झाल्याची बातमी आज समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी संपूर्ण जिल्हाभर पसरली. या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील बाजारपेठ आज सकाळपासून बंद आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.