पुणे, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भीम अनुयायी देशभरातून पुण्यात येतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
मंत्री संजय शिरसाट यांच्या सूचना
पेरणे फाटा येथे 1 जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी चोख व्यवस्था करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. तसेच या परिसरात कायमस्वरूपी सुविधा तयार करण्याच्या दृष्टीने काम करण्यास सांगितले.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येतात, त्यामुळे सोहळ्याचे उत्तम नियोजन करताना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अवकाळी पावसाच्या शक्यतेला लक्षात घेता त्यासाठीही तयारी करावी, अशी सूचना मंत्री शिरसाट यांनी दिली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी
तसेच यावेळी मंत्री शिरसाट यांनी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ परिसराला भेट दिली आणि सर्वप्रथम विजयस्तंभास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिल्याच्या घटनेला 2027 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा संजय शिरसाट यांनी केली. विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करणे ही सर्वांची जबाबदारी असून, या भावनेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संजय शिरसाट यांनी केले.
पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज
दरम्यान, विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन सोहळ्याच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या नागरिकांच्या संख्येला लक्षात घेऊन पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे, ज्यामुळे भाविक आणि नागरिक आपली वाहने पार्क करू शकतील. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व नागरिकांना आमंत्रित केले आणि शांततेत आणि सुव्यवस्थेत सोहळा पार पाडण्याचे आवाहन केले.