भिगवण, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कोरोना महामारीच्या काळात देशभरातील रेल्वे सेवा आणि वाहतुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भिगवण, दौंड आणि नीरा यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरील एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे देखील बंद करण्यात आले होते. चार वर्षांपासून भिगवण स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने, येथील नागरिकांना आणि नियमित प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः नोकरदार, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि इतर प्रवाशांना यामुळे प्रवासासाठी खूप अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी भिगवण, दौंड आणि नीरा स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.
https://x.com/supriya_sule/status/1876166535770669483?t=NGIPweueBBV3JzpARqpllg&s=19
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?
यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, “कोरोना काळानंतर दौंड, भिगवण, नीरा यांसारख्या स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले. यामुळे परिसरातील नियमित प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत नागरिक सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा देखील करीत आहेत. परंतु अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपण नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन या मार्गावरील थांबे पुर्ववत करावे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीही अनेकदा हे रेल्वे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे.
रेल्वे थांबविण्याची मागणी नागरिकांची मागणी
भिगवण स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिक सातत्याने करत आहेत. यासाठी काही नागरिकांकडून विविध आंदोलने देखील राबवली गेली आहेत, तरीही सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या आधी भिगवण स्थानकावर मुंबई, पुणे, हैदराबाद, सोलापूर आणि चेन्नई येणाऱ्या जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबत होत्या. हे स्थानिक नागरिकांसाठी खूप सोयीचे होते. भिगवण स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने आता येथील नागरिकांना आणि नियमित प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भिगवण परिसरातील लोकांना प्रवासासाठी दौंड, पुणे येथील स्थानकावर जावे लागते, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त वेळ आणि खर्चाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने भिगवण स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची गरज आहे.