घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भावेश भिंडेला पोलीस कोठडी

मुंबई, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर एक भले मोठे लोखंडी होर्डिंग पडल्याने 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भावेश भिंडे याला अटक केली होती. त्याला आज मुंबई हायकोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने भिंडे याला राजस्थानमधील उदयपूर येथून काल रात्री अटक केली होती. त्याला आज पहाटे मुंबईत आणण्यात होते.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1791451799158771803?s=19

13 मे रोजी घडली होती दुर्घटना

दरम्यान, भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक आहे. भिंडे याच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपर मधील एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग लावले होते. याठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनापरवाना होते. ते होर्डिंग 13 मे रोजी झालेल्या वादळी पावसात कोसळले होते. या होर्डिंगच्या खाली अनेक लोक आणि वाहने अडकले होते. तसेच या दुर्घटनेत सदर पेट्रोल पंपाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

उदयपूरमध्ये लपून बसला होता

याप्रकरणी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यासह सर्व दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर भिंडे फरार झाला होता. भावेशने तीन दिवस पोलिसांना चकवा दिला होता. मुंबईतील अपघातानंतर भावेश राजस्थानच्या उदयपूरमधील हॉटेलमध्ये लपून बसला होता. गुन्हे शाखेचे पथक भावेशचा देशभर शोध घेत होते. अखेर तो उदयपूरमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेला सापडला. मुंबईत झालेल्या भीषण अपघाताला चार दिवस उलटल्यानंतर याच प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची ही कारवाई इतकी गुपित होती की, उदयपूर पोलिसांनाही त्याचा सुगावा लागू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *