भंडारा, 05 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भंडारा जिल्ह्यातील चिखला येथील भंडारा मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड या (मॉयल) कंपनीच्या भूमिगत खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली. या भूमिगत खाणीतील छत कोसळल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये एक कामगार जखमी झाला आहे. या अपघातातील जखमीला भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आज (दि.05) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
https://x.com/ANI/status/1897242669841309768?t=cdRpbEN4xwTvGcYe-fcIcA&s=19
अशी घडली घटना
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला मॉयल मॅगनीजच्या भूमिगत खाणीमध्ये आज सकाळी ही दुर्घटना घडली. काम सुरू असताना या भूमिगत खाणीतील लेव्हल 3 चे छत अचानकपणे कोसळले. 100 मीटर खोलीवर ही दुर्घटना घडली. या छताखाली तिघे कर्मचारी अडकले. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. परंतु, दुर्दैवाने या घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यावेळी रेस्क्यू टीमच्या मदतीने दोन्ही मृत कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी कामगारावर भंडाऱ्यातील लक्ष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून जखमीची विचारपूस
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील चिखला येथील मॅगनीजच्या भूमिगत खाणीमध्ये झालेल्या अपघातातील जखमीच्या प्रकृतीची भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते यांनी चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी आज भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटल येथे जाऊन जखमीची विचारपूस केली. याची माहिती भंडारा जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, सध्या या जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेची चौकशी सुरू
तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेच्या प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी सध्या केली जात आहे.