भंडारा, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज (दि.24) सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या वेळी या फॅक्टरीमध्ये 13 ते 14 कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. या फॅक्टरीत झालेल्या शक्तीशाली स्फोटामुळे छत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे समजते. आतापर्यंत 7 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी 6 ते 7 लोक अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
https://x.com/InfoBhandara/status/1882714091346870726?t=OoLfzwvn0H8UbTTAFIPLkw&s=19
https://x.com/Dev_Fadnavis/status/1882706487321186502?t=DfA0Alx5SXcqTVAg_RqOuw&s=19
एका कामगाराचा मृत्यू
ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. “आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.” असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
तसेच या घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित असून, सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महापालिकेच्या टीमनेही घटनास्थळी पोहोचले आहे. एनडीआरएफच्या पथकानेही बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक टीम आणि जिल्हा प्रशासन हे संरक्षण दलाच्या समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहेत. वैद्यकीय मदत देखील घटनास्थळी तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
स्फोटाचा तपास सुरू
दरम्यान, हा स्फोट इतका भयंकर होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. या स्फोटाच्या घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फॅक्टरीतून धुराचे लोट हवेत निघताना दिसत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.