राजस्थान, 15 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राजस्थानला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते भजनलाल शर्मा यांनी आज राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. भजनलाल शर्मा हे राजस्थानचे 14 वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यानंतर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली आहे. जयपूरच्या अल्बर्ट हॉल येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी जयपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष सजावट करण्यात आली होती.
https://x.com/ANI/status/1735567433174569146?s=20
https://twitter.com/ANI/status/1735564640380485979?s=19
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हजेरी लावली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्जुन राम मेघवाल आणि गजेंद्र सिंह शेखावत या नेत्यांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली.
https://twitter.com/ANI/status/1735557171889553755?s=19
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला होता. यामध्ये भाजपने 199 जागांपैकी 115 जागा जिंकल्या. तर यामध्ये काँग्रेसला केवळ 69 जागा जिंकता आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
भरतपूरचे रहिवासी भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. भाजपने त्यांना पहिल्यांदाच जयपूरच्या सांगानेरमधून उमेदवारी दिली. ते आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचबरोबर राजस्थानला दोन नवे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे राजस्थानचे नवे उपमुख्यमंत्री असतील. दिया कुमारी या विद्याधरनगर येथून आमदार झाल्या आहेत. तर प्रेमचंद बैरवा हे दुडू विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1735578841312264473?s=19
या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेत्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. “भजनलाल शर्मा जी तसेच उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी आणि प्रेमचंद बैरवा जी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे खूप खूप अभिनंदन. मला विश्वास आहे की, धाडसी महिलांचे हे राज्य तुमच्या नेतृत्वाखाली सुशासन, समृद्धी आणि विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित करेल. येथील माझ्या कुटुंबियांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे, त्या विश्वास आणि आशेवर टिकून राहण्यासाठी भाजप सरकार कठोर परिश्रम करेल.” असे पंतप्रधान मोदी यामध्ये म्हणाले आहेत.