बेस्ट बसने अनेकांना चिरडले; मृतांची संख्या 6 वर, चालकाला अटक

मुंबई, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील कुर्ला परिसरात एका बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. तर 49 जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती. त्यावेळी कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे सोमवारी (दि.09) रात्री उशिरा हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघाताचा पुढील तपास मुंबई पोलीस करीत आहेत.

https://x.com/ANI/status/1866325264499876234?t=oz-huvZ3x1CEzovWN2bwUA&s=19

https://x.com/ANI/status/1866243523315667133?t=YrIh2Xqpxvsol04rHIHKaA&s=19

जखमींवर उपचार सुरू

भरधाव वेगात असलेल्या या बेस्ट बसने कुर्ला परिसरात काही वाहनांना आणि अनेक लोकांना चिरडले. यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 49 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर जखमींना मुंबई महानगरपालिकेचे भाभा रुग्णालय आणि कुर्ल्यातील सायन रुग्णालयासह जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

https://x.com/ANI/status/1866194564895424558?t=kfevimxJA8rAK5ZSrRB6fQ&s=19

अपघाताचे कारण ब्रेक फेल?

दरम्यान, या बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी केला आहे. “कुर्ला स्थानकातून निघालेल्या या बसचे ब्रेक निकामी झाले. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला. त्यावेळी बसवर नियंत्रण ठेवता न आल्याने या बसने अनेक वाहनांना आणि लोकांना धडक दिली.” असे दिलीप लांडे यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *