मुंबई, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्याला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने या संदर्भातील घोषणा केली आहे. या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येत्या 10 जुलै रोजी नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
https://x.com/mieknathshinde/status/1809433701773898004?s=19
10 जुलै रोजी पुरस्काराचे वितरण
दरम्यान, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. हा पुरस्कार 10 जुलै रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या 15 व्या कृषी नेतृत्व संमेलनात प्रदान केला जाईल. या संमेलनासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान तसेच ब्राझील, अल्जेरिया, नेदरलँडचे राजदूत, महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड या राज्यांतील विविध मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, याबाबतची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्याला दरवर्षी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार याआधी 2023 मध्ये बिहारला, तसेच 2022 मध्ये तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशला देण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारकडून सध्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही प्रमुख योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षाला 6 हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे.