लाडकी बहीण योजना; रेशनकार्डमधील नावे कमी करणे व जोडण्याची प्रक्रिया निःशुल्क!

मुंबई, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना रेशनकार्डसह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. ही सर्व कागदपत्रे महिलांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, रेशनकार्डमधील नावे कमी करणे व समाविष्ट करण्याची प्रक्रिया आजपासून निशुल्क करण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता 31 ऑगस्टपर्यंत निशुल्क असणार आहे. या निर्णयामुळे रेशनकार्डमधील नावे कमी करणे व समाविष्ट करण्यासाठी लागणारे 33 रुपयांचे शुल्क आता लागणार नाही.

https://x.com/ChhaganCBhujbal/status/1809417334030823889?s=19

छगन भुजबळांचे अधिकाऱ्यांना निर्देश

यासंदर्भातील निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी पुरवठा विभागासह सर्व शासकीय यंत्रणांना दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी रेशनकार्ड तातडीने द्यावे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांनी संनियंत्रण ठेवावे. रेशनकार्डसह आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. आवश्यक कागदपत्रांसाठी महिला भगिनींना रांगा लावण्याची गरज पडणार नाही, त्यासाठी चोख नियोजन करावे, यांसारखे निर्देश छगन भुजबळ यांनी संबंधितांना दिले आहेत.

दिरंगाई किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही

या निर्देशांचे पुरवठा विभागासह संबंधित शासकीय विभागांकडून काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. जेणेकरून योजनेसाठी अर्ज करताना महिला भगिनींना कोणताही त्रास होणार नाही. यामुळे महिला भगिनींना नक्कीच दिलासा मिळेल आणि योजनेचा लाभ घेणे सुलभ होईल, असे छगन भुजबळ यांना म्हटले आहे. तसेच रेशनकार्डशी संबंधित कामांसाठी दिरंगाई किंवा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *