मुंबई, 16 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे देशात कधीही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देशात लवकरच आचारसंहिता लागू होणार असल्याने राज्य सरकारची या आठवड्यातील ही तिसरी बैठक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारकडून 17 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागाचे मंत्री उपस्थित होते. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1768918286719180883?s=19
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
1) राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी.
2) तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार.
3) मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला.
4) 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
5) संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार.
6) शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण.
7) विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल.
8) पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
9) हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना.
10) संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार.
11) राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार.
12) ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. 50 कोटी अनुदान.
13) भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप.
14) संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार.
15) वृद्ध साहित्यिक व कलाकारांना 5 हजार रुपये मानधन.
16) राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर.
17) श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.