मुंबई, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता राज्य सरकारने नवीन विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे. नव्या एसआयटी पथकात सात अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर जुन्या एसआयटी मध्ये दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. जुन्या एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांच्या निवडीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे आता नवे एसआयटी पथक गठीत करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
https://x.com/SureshDhasBJP/status/1878843212812734794?t=q1EX83OGs3tZJHrn2sdWnQ&s=19
नवीन एसआयटी पथकात कोणते अधिकारी?
नव्या एसआयटीत अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, पोलीस निरीक्षक सुभाष मुठे, पोलीस निरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, पोलीस हवालदार शर्मिला साळुंके आणि दिपाली पवार यांचा समावेश आहे. हे एसआयटी पथक आता आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि जलदगतीने होऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.
जुन्या एसआयटीत या अधिकाऱ्यांचा समावेश
तर यापूर्वीच्या एसआयटी पथकामध्ये पोलीस उप अधीक्षक अनिल गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग शिवलाल जोनवाल, पोलीस उप निरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उप निरीक्षक आनंद शंकर शिंदे, पोलीस उप निरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस शिपाई संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.