बीड, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात शनिवारी (दि.11) रात्री राख वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर (वय 45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मिरवट फाटा परिसरात घडली. राख वाहतूक करणारे एक अवजड वाहन बीड जिल्ह्यातील सौंदाना गावाच्या दिशेने जात असताना, सरपंच क्षीरसागर आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी या वाहनाने अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, सरपंच क्षीरसागर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, वाहनचालक फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी या अपघाताला जबाबदार असणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती निधनामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या या गावात शोककळा पसरली होती. अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेमुळे राख वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवरील नियमबाह्य वाहतुकीच्या समस्यांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा दुर्घटना वारंवार होण्याची भीती व्यक्त होत आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून अशा वाहनांवरील नियंत्रण आणि सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.