बीड, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यात आंदोलन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यात 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.14) मध्यरात्री या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत.
https://x.com/PTI_News/status/1879049510900621614?t=fiZM6eyZh-MWtRdQx5-T6A&s=19
5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई
या आदेशानुसार, अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, कोणालाही सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे किंवा घातक वस्तू बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलने करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
बीड जिल्ह्यात संतापाची लाट
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना या फरार आरोपीला पकडण्यात अद्याप यश आले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
28 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू
त्यामुळे बीड जिल्ह्यात या मुद्द्यावरून विविध आंदोलने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदीचा हा आदेश 28 जानेवारीपर्यंत लागू राहील. तरी नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे आणि शांतता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रशासनाचे या परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.