इगतपुरी, 01 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रेल्वे प्रवासादरम्यान गोमांस बाळगण्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीला काही तरूणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना 3 दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हे वृद्ध व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असून, ते धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस रेल्वेने कल्याण येथे आपल्या मुलीच्या घरी जात होते. या प्रवासादरम्यान त्यांना संशयावरून इगतपुरी येथे काही तरूणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://x.com/ANI/status/1830078573614690806?s=19
तीन जणांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी पीडित वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत ठाणे मध्य रेल्वेचे उपायुक्त मनोज नाना पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. गाडीतील एका सीटवरून हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर हे सर्व घडले. याप्रकरणी मारहाण करणे, धमकावणे आणि रेल्वे स्थानकावर उतरू न देणे या संबंधित वेगवेगळ्या कलमांनुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच या घटनेविषयी नागरिकांनी कोणताही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1830087153013178810?s=19
अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इगतपुरी भागात दोन दिवसांपूर्वी रेल्वे प्रवासादरम्यान एका वृद्ध प्रवाशाला संशयाच्या आधारावर मारहाण करण्यात आल्याची घटना समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आज मी संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.