नागपूर, 10 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागपुरात भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.09) रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, यामध्ये नुकसान अनेक वाहनांचे झाले असून, त्या वाहनांतील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेला रोनित चिंतामवार यांना अटक केली आहे. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत असलेली ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
https://x.com/ANI/status/1833331186862789020?s=19
अटक आणि जामीन मंजूर
काल रात्रीच्या सुमारास नागपुरातील रामदासपेठ परिसरात भरधाव वेगात एका असलेल्या आलिशान ऑडी कारने रस्त्यावरील दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात सबंधित वाहनांतील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी कारचा चालक अर्जुन हावरे आणि त्याच्या शेजारी बसलेला रोनित चिंतामवार यांच्याविरुद्ध रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांचे वैद्यकीय नमुने एफएसएलसाठी पाठवले आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्याचवेळी हा जामीनपात्र गुन्हा असल्याने त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
https://x.com/ANI/status/1833384881247920136?s=19
कारमध्ये संकेत बावनकुळे होते
दरम्यान, या अपघातास कारणीभूत असलेली ही ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे. अपघातावेळी या कारमध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांच्यासह संकेत बावनकुळे हे देखील असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. या अपघात प्रकरणात पोलिसांनी संकेत बावनकुळे यांची देखील चौकशी केल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी संकेत बावनकुळे यांना नोटीस बजावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करीत आहेत.