बारामतीत राज्य दिव्यांग क्रिकेट संघ निवड चाचणी शिबिराचे आयोजन

बारामती, 21 एप्रिलः बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबा जीसाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघ निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे 21 व 22 एप्रिल 2022 रोजी पारपडत आहे. या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र क्रिकेटअसोसिएशन फॉर द डिसेबल्ड (MCAD) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान, आज गुरुवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू धीरज जाधव, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्डचे अध्यक्ष गिरीष शेवते, पाणी फाऊंडेशनचे पश्चिम विभागीय समन्वयक मोहन लाड यांची उपस्थिती होती.

यावेळी दादासाहेब कांबळे यांनी सदर शिबीरासाठी सहभागी दिव्यांग खेळाडुंचे विशेष आभार मानले. तसेच खेळासाठी आपली तंदुरुस्ती आवश्यक असून त्याकरिता नियमित सराव करणे आवश्यक असल्याचेही यावेळी बोलताना सांगितले. यासह गिरीष शेवते यांनी संघटनेबाबत आणि पुढील स्पर्धांबाबत माहिती दिली. या शिबिरामधून निवडल्या जाणाऱ्या खेळाडुंना यापुढील कालावधीत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्र दिव्यांग संघातून विविध स्तरावरील राष्ट्रीय सामने खेळावयास मिळणार असल्याचे सांगितले.

सदर शिबिरासाठी सहभागी खेळाडूंना कोणतेही दडपण न घेता उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्यास महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची उत्तम संधी प्राप्त होईल, असे धीरज जाधव यांनी सांगितले. तरी सर्व खेळाडुंनी आपला उत्तम खेळ करावा, असे त्यांनी नमूद केले. सदर कार्यक्रमास संपुर्ण महाराष्ट्रातून एकुण 45 खेळाडुंनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास बारामती क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अविनाश शिंदे, हेड कोच विजय शिंदे, निवड समिती सदस्य जीवन विरकर तसेच महाराष्ट्र दिव्यांग संघाचे दिलीप लोखंडे, विजय गायकवाड, सातारा जिल्हा पॅरालिंपीक संघटनेचे सचिव विश्वजीत ननावरे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मोहन लाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *