बारामती, 02 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे आज नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. यासोबतच बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या नवीन बस स्थानक, बुऱ्हाणपूर येथील अपर पोलीस उपमुख्यालय, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहत या सुंदर इमारतींचे लोकार्पणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
https://twitter.com/mahancpspeaks/status/1763866839514567160?s=19
निधीची कमतरता भासू देणार नाही!
बारामतीचे नवीन बस स्थानक हे महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. यापुढेही विकास कामांसाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी बारामतीकरांना दिले. बारामती तालुका राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पोलीस उपमुख्यालयाच्या इमारतीसाठी 132 कोटी रुपये आणि पोलीस वसाहतीसाठी 75 कोटी रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथील आयोजित या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार दत्तात्रय भरणे, इतर स्थानिक मान्यवर मंडळी उपस्थित होते.