बारामती, 17 ऑगस्टः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त बारामतीसह देशात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. घरावरील झेंडे 15 ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते; मात्र अद्याप बारामती शहरासह तालुक्यात असंख्य घरांवर तिरंगा ध्वज कायम असून, प्रशासनाच्या आवाहनाचा बारामतीकरांना विसर पडल्याचे चित्र आहे.
बारामतीत शेअर बाजाराच्या नावाखाली 56 लाखांचा गंडा
घरोघरी तिरंगा उपक्रमात सहभागी नागरिकांनी इमारती, घरांवर ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून तिरंगा ध्वज उभारावा, असे आवाहन केले होते. या मोहिमेसाठी नगर परिषद आणि पंचायत समितीने हजारो झेंड्यांचे वाटप केले, तर काही नागरिकांनी स्वतः खरेदी करून आपापल्या घरांवर झेंडे लावले. या मोहिमेसाठी नियमावली तयार केली होती. तिरंगा झेंडा हा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सूर्योदयावेळी फडकवावा आणि सूर्यास्तावेळी उतरवावा, याबाबत कार्यालयांना ध्वजसंहिता पाळावी लागेल, असे सांगण्यात आले होते.
ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा. प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये. अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा यासह इतर नियमावली तयार केली होती. मात्र अनेकांनी 16 ऑगस्टनंतरही ध्वज काढून घेतला नाही. काहींनी वाहनांवरचेही ध्वज अजूनही दिसत आहेत. विविध कारणांनी तिरंगा झेंडा खराब होण्याची शक्यता आहे.