बारामतीकरांना मिळाली सुसज्ज पार्किंग सुविधा

बारामती, 2 जूनः दिवसेंदिवस बारामती शहराचा विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक सुविधा देखील मिळत आहेत. मात्र या शहरीकरणामुळे शहरात आधुनिक समस्याही तयार होताना दिसत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहराची लोकसंख्या देखील वाढताना दिसत आहे. यामुळे शहराची मुख्य बाजार पेठांमध्ये पार्किंगची समस्या देखील दिवसांगणित वाढत चालली आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. यावर पर्याय म्हणून बारामती नगर परिषदेने शहरातील मध्यवर्ती बाजार पेठांजवर एक सुसज्ज अशी दुमजली पार्किंग सुविधा उभारली आहे.

बारामती शहरात येणाऱ्या लोकांना तसेच दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना त्यांची मोटरसायकल, चार चाकी वाहने विनामूल्य सुरक्षित पार्क करण्यासाठी भाजी मंडईच्या वर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पार्किंग सुविधा उभारण्यात आली आहे. ही सुविधा बारामती नगर परिषदेमार्फत विना मूल्य सुरू करण्यात आलेली आहे.

दरम्यान, कोरोना काळात सदर पार्किंगची सुविधा लोकांकडून वापरण्यात आली नाही. आता मात्र सर्व व्यवहार सुरळीत झालेली असताना वाहनांची रस्त्यावर गर्दी वाढल्याचे चित्र आहे. यामुळे बारामती शहरातील भाजी मंडई येथील सुसज्ज दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. सदर ठिकाणी नगर परिषदेतर्फे दोन सुरक्षा रक्षक सुद्धा नेमण्यात आलेले आहेत. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा बसण्यात येणार आहेत. त्यामुळे पेठेतून होणाऱ्या मोटर सायकल चोरींवर आळा बसणार आहे.

यासह तेली विहिर जवळ, पोलीस स्टेशन समोरील मारुती मंदिराच्या बाजूला, होमगार्ड बिल्डिंगच्या बाजूला सिद्धेश्वर गल्ली या ठिकाणी सुद्धा परिषदेने वाहनांना पार्किंग व्यवस्था करून दिलेली आहे. नुकताच सुधारित वाहतूक आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. त्याची सुद्धा अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक तर काही रस्त्यांवर सम विषम पार्किंग होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी दुकानासमोरच वाहने लावण्याची मानसिकता बदलून सुरक्षित ठिकाणी नेमून दिलेल्या पार्किंग व्यवस्थेत आपली वाहने पार्किंग करण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात येत आहे. आजपासून बारामती शहर पोलिसांनी सदर मंडई पार्किंगवर वाहने लोकांनी लावण्याबाबत सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. पहिल्या मजल्यावर मोटर सायकल पार्किंग असेल तर दुसऱ्या मजल्यावर कार पार्किंग असेल. यापुढे रस्त्यावर वाहने लावलेली दिसून आल्यास त्याच्यावर नो पार्किंग फाइन लावला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *