बारामती, 06 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात हॉटेलवर काम करणाऱ्या एका युवकावर तिघा जणांनी दुचाकीवर येऊन बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.04) सायंकाळच्या सुमारास घडली असून, संबंधित युवक जखमी झाला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1908775461825421385?t=jOivu9Oern5r0t8QzoMkvQ&s=19
अजित पवारांनी घेतली दखल
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या अमानुष घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, त्यांनी ट्विटद्वारे कडक भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवारांचे ट्विट
“बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये एका युवकावर काही जणांनी अमानुष मारहाण केली. या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायदा सगळ्यांसाठी समान असून, त्याचे उल्लंघन कोणीही करू नये. असा प्रकार कदापीही सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवारांकडून विकासकामांची पाहणी
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.06) बारामती दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज सकाळपासून बारामतीतील विविध ठिकाणी प्रगतीपथावर असणाऱ्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी सदर विकासकामांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत, आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या.