बारामती, 30 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरात संशयित बांगलादेशी बालमजुरांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी ही बाब उघड करत पोलिस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधला. त्यानंतर बारामती शहर पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका ठेकेदाराच्या कामावरून तीन संशयित बांगलादेशी बालमजुरांची सुटका केली. सध्या हे सर्व बालमजूर पोलिसांच्या ताब्यात असून, बारामती शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पहा व्हिडिओ –
बालमजुरी प्रतिबंधक कायदा काय?
भारतामध्ये बालमजुरी प्रतिबंधक आणि नियमन कायदा, 1986 नुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणत्याही कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच या मुलांना इमारत बांधकामासारख्या धोकादायक उद्योगांमध्ये कामावर ठेवणेही बेकायदेशीर आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित ठेकेदारास 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास आणि 20 ते 50 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस तपासात ही मुले बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध झाल्यास, ठेकेदारावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अनेक प्रश्न उपस्थित
दरम्यान, ही मुले सीमेपलीकडून पलायन करून आली आहेत की त्यांचे अपहरण करून भारतात आणले गेले? याची खात्री अद्याप झालेली नाही. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसून, पुढील तपासानंतरच स्पष्टता येणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.