सांगली, 7 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) गेल्या अनेक दशकांपासून बारामती तालुक्यातील कायम दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न अजूनही तशाचा तसाच पडून आहे. एकीकडे बारामतीच्या विकासाचं मॉडल संपुर्ण देशभरात दाखवत तथाकथित राजकीय पक्षाने नेहमी आपली राजकीय भाकर भाजली आहे. मात्र दुसरीकडे त्याच बारामती तालुक्यातील पश्चिम भाग हा नेहमी तथाकथित राजकीय नेत्यांकडून दुर्लक्षित राहिला, हे पण एक विदारक वास्तव आहे.
सदर दुष्काळ परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना साकडे घातले आहे. बारामती तालुक्यातील नेहमी जिरायत भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पुरंदर उपशाच्या पाण्यासाठी थेट सांगली जिल्हा गाठला आहे. बारामतीच्या शेतकऱ्यांनी थेट सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या घरी जात पाण्याचा प्रश्न मांडला. यावेळी मोराळवाडी गावातील ग्रामस्थांसह भारतीय युवा मोर्चा शाखाध्यक्ष सचिन कारंडे, सचिव रामदास नवले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबा बरकडे, शेखर मासाळ, शहाजी बंडगर आदींनी बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील जे दुष्काळ सदृश्य गावे आहेत, त्या गावांना पुरंदर उपशाचे पाणी चार फूट व्यासाची पाईपलाईन द्वारे बारामती तालुक्यातील वाकी येथील तलावामध्ये सोडण्यासाठी निवेदन दिले.
मराठी पत्रकार परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर
सदरचे निवेदन हे आमदार पडळकर यांनी स्विकारत पुरंदर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी कानेटकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पडळकरांनी गावातील लोकांना प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, या आधी गेली वीस वर्षांपासून या गावातील लोकांचा प्रयत्न चालू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही या लोकांनी संपर्क साधलेला होता. परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन व काम झालेले नाही.
शहरातील ठराविक अतिक्रमणांवर पालिका मेहरबान?
बारामती तालुक्यातील मुर्टी, मोराळवाडी, वाकी, चोपडा, कानडवाडी, मोडवे या भागाला अजूनही कायमस्वरूपी पाण्याची आवश्यकता आहे. शासनाने आमच्या भागाला कायमस्वरूपी व शाश्वस्त पाणी द्यावे, यासाठी नागरिकांनी कित्येक वेळा निवेदन दिलेत, मात्र अजूनही कुठल्या प्रकारचे काम झालेले नाही. येत्या काही दिवसांमध्ये सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढला नाही, तर आम्हा गावकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी भारतीय नायकशी बोलताना म्हटले आहे. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घ्यावी, असेही बारामतीच्या ग्रामस्थांनी म्हटले.
One Comment on “बारामती तालुक्यातील दुष्काळ गावांचा रखडलेला प्रश्न आमदार पडळकरांच्या दरबारी!”