बारामती: आरपीआय (आठवले) पक्षाचे गुरूवारी होणारे हलगी नाद आंदोलन स्थगित

बारामती, 18 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील दलित वस्ती परिसरातील प्रश्न मार्गी लावावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने गुरूवारी (दि.19 सप्टेंबर) बारामती नगर परिषदेच्या समोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.18) बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेतली.

पहा व्हिडिओ –

 

यावेळी महेश रोकडे यांनी बारामतीतील दलित वस्ती परिसरातील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असे लेखी पत्र या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने 19 तारखेचे हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. याची माहिती आरपीआय (आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी दिली. याप्रसंगी, आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



दरम्यान, बारामती शहरातील कोअर हाऊस, आमराई परिसरात होणाऱ्या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे येथील महिला भगिनींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणी पुरवठा नियमित पूर्वीप्रमाणे सकाळी 8 वाजता सुरू करावा. तसेच प्रबुद्धनगर आणि आमराई येथील सार्वजनिक शौचालयातील पाण्याची विद्युत मोटार (पंप) दुरूस्त करण्यात यावी, यांसारख्या विविध मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर आरपीआय (आठवले) पक्षाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा रविंद्र सोनवणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *