बारामती, 20 फेब्रुवारीः बारामती काय होईल, याचा काही नेम नाही! कधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणारं केंद्रबिंदू ठरतंय, तर कधी गुन्हेगारीचा आलेख वाढल्याने राज्यभर चर्चाला येत आहे. मात्र आता बारामतीत एका नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ते कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून बारामतीत चक्क राखेचा पाऊस पडल्याची चर्चा होत आहे. दररोज रात्री आकाशातून राख पडल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे. यामुळे बारामतीकरांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या राखेच्या पावसामागे नेमकं कारण काय आहे? या मागचे कारण भारतीय नायकच्या टीमने शोधून काढले आहे.
बारामती तालुक्यासह आसपासच्या परिसरात माळेगांव साखर कारखाना, सोमेश्वर साखर कारखाना, बारामती ऍग्रो साखर कारखाना आणि भवानीनगर साखर कारखाना असे एकूण चार ऊस कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांच्या धूरकांड्यातून बाहेर पाडणारी राख वातावरणात वरती जाते, मात्र हवा थंडी झाली की रात्रीच्या वेळी ती राख पुन्हा जमीनीच्या दिशेने येते.
तसेच या चारही साखर कारखानाच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकांनी हजारो हेक्टर एकरात ऊस हे पिक घेतले आहे. आपला ऊस कारखान्यात वजन कमी होण्याआधीच जावा, या हेतुने अनेकांनी जाणूनबुजून ऊस पेटवल्याचे चित्र आहे. यामुळे पेटलेल्या उसाची राख हवेतून दुरवर पसरत आहे. तसेच संध्याकाळच्यावेळी तीच राख पावसाप्रमाणे खाली येत आहे.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यासह आसपासच्या परिसरात अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. तसेच मोटरसायकल चालकांना गाडी चालवताना राख डोळ्यात गेल्याने छोटे मोठे अपघात होताना दिसत आहे. तसेच डोळ्यांना इजा देखील पोहोचत आहे. याकडे प्रदुषण विभागाने लवकरात लवकर लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य बाारामतीकरांकडून होताना दिसत आहे.