मुंबई, 25 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालये स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या दोन्ही महाविद्यालयांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, प्रत्येकी 671 कोटी 77 लाख 93 हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1894398087592120681?t=LUUqm4Ri_TOS8FPJpyt4UA&s=19
दरवर्षी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश
या नवीन निर्णयानुसार, परळी येथील महाविद्यालयासाठी 75 एकर, तर बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे 82 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये दरवर्षी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील पशुवैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
मनुष्यबळ व वित्तीय तरतूद
हा निर्णय घेताना राज्य सरकारने या दोन्ही महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 276 पदांना मंजुरी दिली आहे, त्यामध्ये शिक्षक संवर्गातील 96, शिक्षकेतर संवर्गातील 138 आणि बाह्यस्त्रोताद्वारे भरावयाच्या शिक्षकेतर संवर्गातील 42 पदे आहेत. याशिवाय राज्य सरकारने या दोन्ही महाविद्यालयांच्या नियमित कामकाजासाठी पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येकी 107 कोटी 19 लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. तसेच, नवीन महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या इमारतींचे बांधकाम, उपकरणे, यंत्रसामग्री, वाहने, तसेच पाणीपुरवठा, विहीर, विंधन विहीर यांसारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.